फलटण (प्रतिनिधी):रस्त्यावरून वेगाने आणि सायलेन्सरचा मोठा आवाज करत मोटारसायकल चालवणाऱ्या मुलांना हटकल्याच्या कारणावरून, फलटण येथील एका गॅरेज चालकावर आणि त्यांच्या भावावर लाकडी दांडक्याने व सतुराने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल विठ्ठल हिरणवाळे (रा. ब्राह्मणगल्ली, फलटण) हे दि. २२/०२/२०२६ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास आपले गॅरेज बंद करून समोर थांबले होते. यावेळी गोसावी वस्तीतील ७ ते ८ मुले मोटारसायकलवरून वेगाने आणि मोठा आवाज करत तिथून जात होती.
"गाडीचा धक्का कोणाला लागू नये आणि अपघात होऊ नये," या उद्देशाने अनिल हिरणवाळे यांनी संबंधित मुलांना एवढ्या वेगात गाड्या का चालवता? असे विचारले. याच गोष्टीचा राग मनात धरून त्या टोळक्याने अनिल हिरणवाळे व त्यांचा भाऊ संतोष हिरणवाळे यांना हाताने, लाकडी दांडक्याने आणि सतुराने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर अनिल हिरणवाळे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे:
अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज दि. २४/०२/२०२६ रोजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, फलटण यांच्यासमोर हजर केले असता, त्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या गुन्ह्यातील उर्वरित संशयित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. सदर प्रकरणाचा पुढील तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे हे करत आहेत.