नदीत तरंगणारा तो मृतदेह 'त्या' बेपत्ता अंकुशचाच; इन्स्टाग्रामवरील चॅटिंगने लावला खुनाचा छडा.
फलटण (प्रतिनिधी):एका २२ वर्षीय तरुणाचा अत्यंत थंड डोक्याने कट रचून खून करणाऱ्या टोळीचा फलटण ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. प्रेमाचे खोटे नाटक रचून, इन्स्टाग्रामवरून जाळ्यात ओढत या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एकाच कुटुंबातील ४ जणांना अटक केली असून, 'ऑनर किलिंग'च्या छायेत असलेल्या या गुन्ह्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी फलटण तालुक्यातील गोखळी गावच्या हद्दीत नीरा नदीच्या पात्रात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला होता. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र पोलिसांनी तपास चक्र फिरवल्यानंतर हा मृतदेह अंकुश बापू नरबट (वय २२, रा. ढाकणी, ता. माण) याचा असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. मृत अंकुशने आरोपींच्या कुटुंबातील एका मुलीबाबत गैरवर्तन केले होते. याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी त्याला संपवण्याचे ठरवले. त्यांनी सोशल मीडियाचा वापर हत्यार म्हणून केला:
हा गुन्हा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला होता. पोलिसांकडे सुरुवातीला कोणताही पुरावा नव्हता. मात्र, फलटण ते दहीवडी रोडवरील हॉटेल, दुधडेअरी आणि पेट्रोल पंपांवरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोबाईल लोकेशनच्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयाची सुई आरोपींकडे वळवली आणि गुन्ह्याची साखळी जोडली.
१. आविष्कार ज्ञानेश्वर भगत
२. श्रद्धा आविष्कार भगत
३. ज्ञानेश्वर भरतराव भगत
४. अर्चना ज्ञानेश्वर भगत
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप, फौजदार दिपक पवार, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सुर्यवंशी आणि हणमंत दडस यांनी केली आहे.
पोलिसांचे आवाहन: सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना काळजी घ्यावी आणि अशा कोणत्याही संशयास्पद कृत्यांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी.