कोयना धरण परिसरात शनिवारी दुपारी दोन भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता २.९ व ३.० इतकी नोंदविण्यात आली आहे.
या भूकपांचा कोणताही परिणाम कोयना धरणावर झाला नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली. तर पाटण तालुक्यात या भूकंपात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांनी सांगितले. शनिवारी दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी पहिला भूकंप झाला तो २.९ रिश्टर स्केलचा होता. त्यानंतर लगेचच १ वाजून ५७ मिनिटांनी दुसरा ३.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला. हे दोन्ही भूकंप कोयना धरणापासून १३.६ किलोमीटर अंतरावर होते. त्यांची खोली सात किलोमीटर अंतरावर असून या दोन्ही भूकंपांचा केंद्रबिंदू वारणा खोर्यात जावळे गावच्या वायव्येस ८ किलोमीटर अंतरावर असल्याचे भूकंप मापन केंद्र कोयनानगर येथून सांगण्यात आले. हे दोन्ही भूकंप कोयना, पाटण, पोफळी, अलोरे यासह पाटण, चिपळूण, वारणा, जावली खोर्यात जाणवले. या भूकंपांचा कोयना धरणावर कोणताही परिणाम झाला नसून पाटण तालुक्यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.