फलटण (प्रतिनिधी):फलटण तालुक्यातील जाधववाडी येथील 'ऑरेंज लॉज'वर पोलिसांनी मंगळवारी धाडसी कारवाई करत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी लॉजवरील एका संशयिताला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जाधववाडी येथील ऑरेंज लॉजमध्ये काही काळापासून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी लॉजवर छापा टाकला. या छाप्यात एका महिलेच्या
हतबलतेचा फायदा घेऊन, तिला आर्थिक आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी प्रवीण रामचंद्र दडस (वय २६, रा. टाकेवाडी, ता. माण, जि. सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची गुन्ह्यातील सखोल चौकशी करण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. फलटण शहरचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले.
या पथकात खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता:
महत्त्वाची नोंद: फलटण परिसरातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी कडक नजर वळवली असून, अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.