मुरूम येथील घटना: वटमुखत्यारपत्राचा गैरवापर करून परस्पर केले खरेदीखत; खोट्या सह्या आणि अंगठ्यांचा वापर
फलटण (प्रतिनिधी):व्यवसाय वाढवण्यासाठी घेतलेले ६ लाख रुपयांचे कर्ज एका तरुणाच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली आहे. जमिनीचा केवळ 'करारनामा' करण्याऐवजी फसवणुकीने 'वटमुखत्यारपत्र' (POA) लिहून घेत, मुरूम (ता. फलटण) येथील तरुणाची कोट्यवधी रुपयांची जमीन हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुणे येथील संशयित आरोपीविरुद्ध फसवणुकीचा आरोप करण्यात आला असून, हे प्रकरण आता थेट न्यायालयात पोहोचले आहे.
मुरूम येथील अक्षय नारायण पवार (वय २७) हा तरुण पुण्यात इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करतो. व्यवसायासाठी पैशांची नड असल्याने अक्षयने पुण्याच्या अशोक ईराप्पा भंडारी याच्याकडून ६ लाख रुपये व्याजाने घेतले होते. २१ ऑगस्ट २०२४ रोजी या कर्जाच्या बदल्यात जमिनीचा करारनामा करण्याचे ठरले होते, मात्र आरोपीने केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर अक्षयची फसवणूक करून वटमुखत्यारपत्र लिहून घेतले.
आरोपीने केवळ जमीनच हडपली नाही, तर अक्षयची निळ्या रंगाची ॲक्टिव्हा गाडीही (MH-12-NN-9442) जबरदस्तीने पळवून नेली. या अन्यायाविरुद्ध अक्षयने २१ जुलै २०२५ रोजी फलटण ग्रामीण पोलीस आणि ४ ऑगस्ट रोजी सातारा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. मात्र, पोलिसांकडून ठोस कारवाई न झाल्याने पीडित तरुणाने आता न्यायालयात सत्यप्रतिज्ञेवर दाद मागितली आहे.
साक्षीदारांचीही चौकशी होणार?
या बोगस खरेदीखतासाठी वैभव एस. कामठे आणि दीपक चव्हाण (दोघे रा. धायरी, पुणे) यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.
या घटनेमुळे फलटण तालुक्यात खासगी सावकारी आणि फसवणुकीच्या मार्गाने जमिनी हडपणाऱ्या टोळ्यांची चर्चा ऐरणीवर आली आहे.