फलटण/प्रतिनिधी:जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातील पदोन्नती प्रकरणाचा लाचखोरीचा बाजार अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) उघड केला आहे. पदोन्नती मिळाल्याच्या बदल्यात २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या केंद्रनायकासह तिघांना पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईने शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
तक्रारदाराला ३१ डिसेंबर २०२५ रोजी 'फलटण नायक' पदावर पदोन्नती देण्यात आली होती. ही पदोन्नती मिळाल्याचा आनंद साजरा करण्याऐवजी, कार्यालयातील वरिष्ठ मंडळींनी या बदल्यात 'बक्षीस' म्हणून चक्क २५ हजार रुपयांची मागणी केली. लाचेची ही मागणी वारंवार होत असल्याने तक्रारदाराने २० फेब्रुवारी रोजी एसीबीकडे धाव घेतली.
१. पहिली मागणी: तक्रारीनुसार, केंद्रनायक नानासाहेब मोखडे, प्रशासकीय अधिकारी माणिक वाडेकर आणि वरिष्ठ फलटण नायक ज्ञानोबा लटपटे यांनी संगनमताने २५ हजार रुपये मागितले होते.
२. ऑनलाईन वसुली: धक्कादायक बाब म्हणजे, यातील ८ हजार रुपये यापूर्वीच तक्रारदाराकडून ऑनलाईन पद्धतीने वसूल करण्यात आले होते.
३. तडजोड आणि सापळा: २० फेब्रुवारीला हॉटेल जगदंबा येथे पडताळणी झाली असता, उर्वरित रकमेत तडजोड करून १२ हजार रुपयांची मागणी निश्चित झाली.
४. रंगेहात अटक: २३ फेब्रुवारी रोजी जिंतूर रस्त्यावरील 'हॉटेल रायबा' येथे सापळा लावण्यात आला. यावेळी वरिष्ठ फलटण नायक ज्ञानोबा लटपटे यांनी १२ हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना झडप घालून पकडले.
अंगझडतीमध्ये आरोपींकडून मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सध्या आरोपींच्या घरांची झडती घेण्याचे काम सुरू असून, त्यांच्या मालमत्तेचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात 'भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८' नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलिस निरीक्षक अल्ताफ मुलाणी यांच्या नेतृत्वात व पोलिस उपाधिक्षक राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
"शासकीय कामासाठी कुणीही लाचेची मागणी केल्यास तत्काळ एसीबीशी संपर्क साधावा," असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.