फलटण शहर पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल.
फलटण (प्रतिनिधी):शहरातील शंकर मार्केट परिसरात 'गाडी वेगात चालवू नका' असे सांगणाऱ्या गॅरेज व्यावसायिकावर १०-१२ जणांच्या टोळक्याने लोखंडी सतुरा आणि बिअरच्या बाटल्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात प्रशांत सुनील जुवेकर आणि त्याच्या ७ ते ८ साथीदारांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल विठ्ठल हिरणवाळे (रा. ब्राह्मणगल्ली, फलटण) हे रविवारी रात्री ९:३० च्या सुमारास आपले गॅरेज बंद करून समोर थांबले होते. यावेळी गोसावी वस्तीतील ७ ते ८ मुले मोटारसायकलचा मोठा आवाज करत वेगाने तिथून जात होती. 'कोणाला तरी गाडी धडकेल, वेगात का चालवता?' असे अनिल यांनी विचारल्याचा राग मनात धरून आरोपी प्रशांत जुवेकर याने "तू आम्हाला कोण सांगणार, थांब तुला दाखवतो" अशी धमकी दिली.
धमकी देऊन गेल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत आरोपी पुन्हा टोळक्यासह घटनास्थळी परतले. "तू आम्हाला शहाणपण शिकवतो का?" असे म्हणत प्रशांत जुवेकर याने हातातील लोखंडी सतुऱ्याने अनिल हिरणवाळे यांच्या डोक्यात जिवे मारण्याच्या उद्देशाने वार केला. इतर ७ साथीदारांनी लाकडी दांडके आणि बिअरच्या बाटल्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. भावाच्या मदतीला धावून आलेले संतोष रखमाजी हिरणवाळे यांच्यावरही सतुऱ्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले.
या घटनेनंतर जखमी अनिल हिरणवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११७(२), ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्री. दिनेश शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
भरवस्तीत झालेल्या या शस्त्रांच्या नंगा नाचामुळे फलटणकरांमध्ये भीतीचे वातावरण असून, आरोपींना कडक शासन करण्याची मागणी होत आहे.