फलटण: (प्रतिनिधी)विश्वास संपादन करायचा, माल उचलायचा आणि पैसे द्यायची वेळ आली की धमकी द्यायची... असाच काहीसा प्रकार फलटण तालुक्यातील राजुरी येथे समोर आला आहे. शेवगा खरेदीच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याने राजुरी येथील व्यवसायिकाला तब्बल १२ लाख २५ हजार १६२ रुपयांना चुना लावला असून, या आर्थिक फसवणुकीमुळे फलटण परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजुरी (ता. फलटण) येथील पांडुरंग भिसे (वय ३०) यांचा 'महालक्ष्मी व्हेजिटेबल ट्रान्सपोर्ट' नावाचा भाजीपाला खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या या व्यवसायाचा फायदा घेत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कोची येथील अमोल जोंधळे या संशयित आरोपीने त्यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला गोड बोलून आणि नियमित व्यवहार करून त्याने भिसे यांचा पूर्ण विश्वास संपादन केला.
विश्वास बसल्यानंतर जोंधळे याने पांडुरंग भिसे यांच्याकडून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात शेवगा खरेदी केला. एकूण व्यवहाराची रक्कम १६ लाख ६३ हजार ३३२ रुपयांवर पोहोचली होती. यापैकी आरोपीने ४ लाख ३८ हजार १७० रुपये ऑनलाइन पाठवून भिसे यांचा विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, उर्वरित १२ लाख २५ हजार १६२ रुपये देण्यास त्याने टाळाटाळ सुरू केली.
हक्काचे पैसे मागण्यासाठी जेव्हा पांडुरंग भिसे यांनी आरोपीला फोन केला, तेव्हा त्याने आपला खरा चेहरा दाखवला. "पैसे मागू नकोस, अन्यथा परिणाम भोगावे लागतील," अशी सणसणीत धमकी आरोपी अमोल जोंधळे याने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मोठ्या कष्टाने कमावलेले लाखो रुपये अडकल्याने अखेर भिसे यांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी पांडुरंग भिसे यांनी फलटण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, संशयित आरोपी अमोल जोंधळे विरोधात बीएनएस (BNS) कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. फसवणूक करून धमकावणाऱ्या या प्रवृत्तीमुळे आता शेतीमाल व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.