फलटण : तालुक्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडाकडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या जोराच्या पावसामुळे वेलवर्गीय भाजीपाला पिकांसह आडसाली ऊस, उन्हाळी भुईमुगाचे पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे, तर शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीला पोषक वातावरण होणार आहे.
फलटण तालुक्यात दोन दिवसांपासूनच उकाड्यात वाढ व ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी दुपारी बारापासूनच आकाशात ढग जमा होण्यास सुरुवात झाली होती. दुपारनंतर सव्वाचारच्या सुमारास सगळीकडे ढग दाटून आले. त्यामुळे दिवसा मावळल्यासारखे वातावरण झाले होते.
अचानक विजांचा कडकडाटास सुरुवात झाली. काही क्षणांतच वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अकरा वाजेपर्यंत सुमारे तीन तास पाऊस पडला. जोरदार पावसामुळे उकाड्यापासून थोडा गारवा मिळाला. मात्र काल झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे.