हनी ट्रॅप लावून पुणेकर व्यावसायिकाला लुटणारी टोळी गजाआड; फलटण पोलिसांची 'धडाकेबाज' कारवाई!
फलटण (प्रतिनिधी):एका हॉटेल व्यवसायिकास गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे आणि नंतर बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एका सराईत टोळीचा फलटण शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार महिलेसह एकूण १० आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ३२ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ येथील हॉटेल व्यावसायिक आनंद काशिनाथ दळवी यांना ११ फेब्रुवारी २०२६ रोजी एका महिलेने मोबाईलवर 'Hi' असा मेसेज पाठवला. त्यानंतर व्हॉट्सअॅप कॉलद्वारे त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील संभाषण केले. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.१५ च्या सुमारास या महिलेने दळवी यांना फलटणमधील बुधवारपेठ येथील एका फ्लॅटवर बोलावून घेतले.
तेथे दबा धरून बसलेल्या साहिल, वैभव, रोहन, विनायक, राजू बोके आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांनी दळवी यांना गाठले. "तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करतो" अशी धमकी देत या टोळीने त्यांना बेदम मारहाण केली आणि ४० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
आरोपींनी दळवी यांच्याकडून रोख रक्कम, एटीएम आणि क्रेडिट कार्डद्वारे जबरदस्तीने १ लाख ९५ हजार रुपये काढून घेतले. एवढ्यावरच न थांबता, त्यांना फलटणबाहेर पुणे रस्त्यावर सोडण्याच्या बहाण्याने नेले. वाटेत गाडी अडवून आरोपींनी दळवी यांच्या गळ्यातील २० तोळे वजनाची (किंमत ३० लाख रुपये) सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेतली.
१४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल होताच, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान पोलिसांनी अत्यंत शिताफीने खालील १० आरोपींना अटक केली आहे:
पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेल्या दागिन्यांपैकी २९ लाख ५२ हजार ८०९ रुपयांचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि मोबाईल असा एकूण ३२ लाख ७२ हजार ८०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील ५ आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.
"अडकवलेल्या सर्व आरोपींची पोलीस कोठडी संपत असल्याने आज (दि. २०) त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे," अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी दिली.