शंकर मार्केट पाठोपाठ आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हादरले; व्यापाऱ्यांवर सलग हल्ल्यांनी फलटणमध्ये खळबळ.
फलटण (विशेष प्रतिनिधी):फलटण शहरात गुन्हेगारांचे मनोबल इतके वाढले आहे की, आता भररस्त्यात होणारी भांडणे सोडवण्यास जाणेही व्यापाऱ्यांच्या अंगाशी येऊ लागले आहे. मंगळवारी, २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आंबेडकर चौक ते शिवाजी चौक मार्गावर असलेल्या 'हिंदुस्तान हार्डवेअर' समोर एका कट मारण्याच्या कारणावरून झालेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या पटेल बंधूंना आणि त्यांच्या कामगारांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ व अपमानित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दोन इसम भरधाव वेगाने गाडी चालवत असताना 'कट' मारल्याच्या कारणावरून दुकानाबाहेर रस्त्यावर प्रचंड हाणामारी व गोंधळ सुरू झाला. हा गोंधळ वाढल्याने आणि व्यवसायावर परिणाम होत असल्याने, माणुसकीच्या नात्याने हिंदुस्तान हार्डवेअरचे मालक पटेल बंधू हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला पुढे सरसावले. त्यांनी संबंधित तरुणांना "दुकानाबाहेर भांडण करू नका" अशी विनंती केली.
परंतु, या साध्या विनंतीचा राग मनात धरून त्या दोन उर्मट तरुणांनी थेट पटेल बंधूंवर धावून जात त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, दुकानातील कामगारांना सुद्धा जातीवाचक शिवीगाळ करून धमकावण्यात आले. यामुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दोन दिवसांपूर्वीच शंकर मार्केट परिसरात 'गाडी हळू चालवा' म्हटल्याने कोयते निघाले होते. त्यानंतर आता ही दुसरी घटना घडल्याने फलटणमधील व्यापारी वर्ग प्रचंड धास्तावलेला आहे.
या घटनेनंतर फलटणमधील व्यापारी बांधवांनी एकत्र येत फलटण शहर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली आहे. आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि व्यापाऱ्यांना संरक्षण मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी कठोर पावले न उचलल्यास व्यापारी संघटना तीव्र भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.