फलटण (प्रतिनिधी): शहरात रविवारी बाजाराचा दिवस असल्याने सर्वत्र गजबज असताना, रात्रीच्या वेळी गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांचा धाक उरला नाही, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. शंकर मार्केटमधील गवळी गॅरेजसमोर गॅरेजचे मालक अनिल हिरणवळे आणि संतोष हिरणवळे या दोन तरुणांवर १० ते १२ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रे, दगड आणि बाटल्यांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण फलटण शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
आज रविवार, सुट्टीचा आणि बाजाराचा दिवस असल्याने रात्रीच्या वेळीही शंकर मार्केट परिसरात मोठी गर्दी होती. रात्री ९ वाजेच्या सुमारास अनिल आणि संतोष हिरणवळे यांनी संबंधित आरोपींना 'गर्दीत गाडी जोरात चालवू नका' असे हटकले. याच कारणावरून आरोपींनी सुरुवातीला वाद घातला आणि ते तिथून निघून गेले.
मात्र, काही वेळातच हे आरोपी १०-१२ जणांच्या टोळक्यासह हातात धारदार शस्त्रे, दगड आणि काचेच्या बाटल्या घेऊन पुन्हा घटनास्थळी आले. काहीही विचार न करता त्यांनी अनिल आणि संतोष यांच्यावर तुटून पडत त्यांच्या डोक्यावर, तोंडावर आणि हातावर सपासप वार केले. रात्रीच्या वेळी भरवस्तीत झालेल्या या रक्तरंजित हल्ल्यामुळे परिसरात एकच पळापळ आणि घबराट निर्माण झाली.
हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना तातडीने फलटण येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच हॉस्पिटल परिसरात तरुण आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये धाव घेतली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शहराच्या हृदयस्थळी, जिथे रात्रीच्या वेळीही लोकांची वर्दळ असते, अशा ठिकाणी टोळक्याने येऊन शस्त्राने वार करणे, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. या घटनेनंतर फलटणकरांमधून संताप व्यक्त होत असून "पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का?" असा टोकदार सवाल आता विचारला जात आहे. रात्री-अपरात्री अशा घटना घडत असतील, तर सामान्य नागरिकांनी बाहेर पडायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुढील तपास:
फलटण पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत करत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.