फलटण:
सासवड आगारात शिरून फलटण आगाराचे चालक सचिन नाळे (बॅच क्र. १८०८८) यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ फलटण आगारातील कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कामगार संघटनेच्या वतीने दि. १ व २ मार्च २०२६ रोजी काळ्या फिती लावून करण्यात आलेल्या आंदोलनास फलटण आगारातील कर्मचाऱ्यांनी १००% प्रतिसाद देऊन या घटनेचा निषेध नोंदवला.
नेमकी घटना काय?
दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी फलटण-मुंबई ही कामगिरी घेऊन जात असताना, सासवड आगारात अज्ञात तीन इसमांनी चालक सचिन नाळे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात नाळे यांच्या मानेवर वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले होते. एका कर्तव्यदक्ष चालकावर अशा प्रकारे आगारात शिरून झालेला हा हल्ला संपूर्ण एसटी प्रशासनाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
संघटनेचा इशारा: 'आरोपींना अटक करा, अन्यथा काम बंद'
या घटनेचा निषेध करण्यासाठी फलटण आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवली. संघटनेचे सचिव योगेश भागवत व अध्यक्ष सुधीर नलावडे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, "जर या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई झाली नाही, तर संघटनेच्या वतीने लवकरच तीव्र 'काम बंद' आंदोलन छेडले जाईल."
सातारा विभागीय संघटनेचा पाठिंबा
या हल्ल्याची दखल सातारा विभागीय संघटनेने देखील घेतली आहे. केंद्रीय उपाध्यक्ष/विभागीय अध्यक्ष श्री. शिवाजीराव देशमुख यांनी प्रशासनाला बजावले आहे की, "हा केवळ एका चालकावरचा हल्ला नसून संपूर्ण व्यवस्थेवरील हल्ला आहे. आरोपींना त्वरित अटक न झाल्यास संपूर्ण सातारा जिल्ह्यात काळ्या फिती लावून निषेध केला जाईल आणि त्यानंतरही कारवाई न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात काम बंद आंदोलन करण्यात येईल."
प्रशासनाला दिलेल्या निवेदनातील प्रमुख मागण्या:
१. संबंधित हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी.
२. एसटी चालक-वाहकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना जाहीर कराव्यात.
३. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आगार परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करावा.
"हा लढा आमच्या सुरक्षिततेसाठी आहे. न्याय मिळेपर्यंत कर्मचारी शांत बसणार नाहीत," असा निर्धार यावेळी कामगारांनी व्यक्त केला. जर या आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय झाली, तर त्यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.