फलटण: शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वर काढले असून, आता चक्क भरदिवसा मुली पळवण्याचे प्रकार समोर येऊ लागल्याने पालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मलठण (संतोषीमाता नगर) परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय मुलगी १४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घरातून दुकानात जाण्यासाठी निघाली होती. तिने आपल्या लहान बहिणीलाही सोबत येण्यास सांगितले होते, मात्र बहिणीने नकार दिल्याने ती एकटीच बाहेर पडली. बराच वेळ होऊनही मुलगी घरी न परतल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली.
मुलीच्या आईने तात्काळ तिच्या मोबाईलवर संपर्क साधला. फोनची रिंग वाजत होती, मात्र पलीकडून कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर नातेवाईक, एसटी स्टँड आणि शहर परिसरात सर्वत्र शोध घेऊनही मुलीचा थांगपत्ता लागला नाही. अखेर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला लग्नाचे किंवा इतर कोणतेही आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची खात्री पटताच पालकांनी पोलिसांत धाव घेतली.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा (भारतीय दंड विधान कलम ३६३ प्रमाणे) गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीतून मुलगी बेपत्ता झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे वेगाने तपास करत आहेत.
पालकांना आवाहन: आपल्या पाल्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा आणि संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.