फलटण (प्रतिनिधी):
फलटण तालुक्यातील जाधववाडी येथे भरदिवसा एका दुकानात शिरून अज्ञात चोरट्यांनी दुकानदाराच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सिगारेट घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन तरुणांनी वयोवृद्ध दुकानदाराला लक्ष करत सुमारे १ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
जाधववाडी येथील रहिवासी रमेश जयवंत कदम (वय ६५) यांचे गावातच 'युगंधर किराणा स्टोअर्स' नावाचे दुकान आहे. शनिवारी (दि. २१) दुपारी ४:३० च्या सुमारास कदम हे आपल्या दुकानात नेहमीप्रमाणे बसले होते. यावेळी एका दुचाकीवरून दोन अनोळखी तरुण दुकानासमोर आले.
त्यांनी कदम यांच्याकडे सिगारेटची मागणी केली. सिगारेट घेतल्यानंतर त्यांनी १५ रुपये दिले. कदम हे उरलेले पैसे परत देत असताना, संधी साधून एका तरुणाने त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जोरात हिसकावली. काही कळण्याच्या आतच दोन्ही चोरटे आपल्या दुचाकीवरून सुसाट वेगाने पसार झाले.
चोरट्यांनी लंपास केलेल्या सोन्याच्या साखळीची किंमत अंदाजे १ लाख रुपये इतकी आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या वेळी ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दुकानदारांना आवाहन: वाढत्या चोरीच्या घटना पाहता, दुकानदारांनी अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना सतर्क राहावे आणि शक्य असल्यास आपल्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.