फलटण (प्रतिनिधी):फलटण तालुक्यातील कोळकी परिसरात शनिवारी दुपारी एका भीषण अपघाताने नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. फलटण-दहिवडी मार्गावर असलेल्या एका कार सर्व्हिस सेंटरमध्ये अनियंत्रित झालेला महाकाय कंटेनर थेट घुसला. या अपघातात गॅरेजमधील वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, एका कामगाराचा जीव थोडक्यात वाचला आहे.
शनिवारी (दि. २१) दुपारी साधारण ३:३० च्या सुमारास फलटण-दहिवडी मार्गावरून एक कंटेनर अत्यंत वेगाने जात होता. कोळकी येथील 'डी.सी. कार सर्व्हिस' या गॅरेजजवळ आला असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. काळ बनून आलेला हा कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या गॅरेजचे पत्र्याचे शेड तोडून थेट आत घुसला.
यावेळी गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्या उभ्या होत्या. कंटेनरच्या धडकेमुळे या गाड्यांचे अक्षरशः पत्रे पिळवटले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
कंटेनर ज्यावेळी गॅरेजमध्ये शिरला, तेव्हा तिथे काम सुरू होते. या अपघातात अहमद शेख हे किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने, मोठी जीवितहानी टळली असली तरी गॅरेजच्या मालकाचे आणि वाहनधारकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी दीपक शिवशरण छूरे (रा. भडकमकरनगर) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून कंटेनर चालक संभाजी दगडू जगताप (वय ४५, रा. धारपुडी) याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरवस्तीत आणि मुख्य मार्गावर हा अपघात झाल्याने परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून कंटेनर बाजूला काढण्याची प्रक्रिया सुरू केली.
स्थानिकांची मागणी: फलटण-दहिवडी मार्गावर वाहनांचा वेग प्रचंड असतो, त्यामुळे या परिसरात गतिरोधक बसवावेत किंवा वेगावर नियंत्रण आणावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.