मुख्य सूत्रधार महिलेसह अन्य साथीदारांनाही बेड्या; २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
फलटण (प्रतिनिधी):एका पुणेकर हॉटेल व्यावसायिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, अश्लील संभाषण करून आणि बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या मोठ्या टोळीचा फलटण शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यापूर्वी पाच आरोपींना अटक केल्यानंतर, आता या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार महिला आणि फरार असलेल्या तिच्या साथीदारालाही जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.
पुणे येथील एका हॉटेल व्यावसायिकास फलटणमधील एका महिलेने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी दुपारी त्याला बुधवारपेठ, फलटण येथील एका फ्लॅटवर बोलावून घेण्यात आले. तेथे टोळीने संगनमताने कट रचून तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली आणि खंडणीची मागणी केली.
१४ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि अवघ्या २ तासांत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या पाचही जणांनी गुन्ह्याची कबुली दिली होती.
यापूर्वी अटक करण्यात आलेले पाच आरोपी:
गुन्हा घडल्यापासून फरार असलेली मुख्य संशयित महिला आणि तिचा साथीदार सागर ऊर्फ टक्या भाई मोहन साळुंखे (रा. वीर, ता. पुरंदर) हे पोलिसांना गुंगारा देत होते. मात्र, पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे या दोघांचा ठावठिकाणा शोधून काढला आणि त्यांना १५ फेब्रुवारी रोजी शिताफीने अटक केली.
अटक करण्यात आलेल्या या नवीन आरोपींना १६ फेब्रुवारी रोजी फलटणच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या आरोपींना २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे अधिक जोमाने करत आहेत.