रामआदेश न्यूजच्या वृत्तानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; अवैध केबिन संस्कृतीवर हातोडा, तर लॉजिंगमधील देहाविक्रयाचा अड्डा उद्ध्वस्त.
फलटण (प्रतिनिधी):शहराच्या सुसंस्कृतपणाला काळिमा फासणाऱ्या 'कॅफे' संस्कृतीचा आणि लॉजिंगच्या आडून चालणाऱ्या काळ्या धंद्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर, फलटण पोलिसांनी आता गुन्हेगारांविरुद्ध युद्ध पुकारले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या तक्रारी आणि रामआदेश न्यूज ने मांडलेल्या बातमीची दखल घेत, पोलिसांनी शहरासह ग्रामीण भागात मोठी 'सर्च मोहीम' राबवून अवैध धंदे करणाऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे.
या धडक कारवाईबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी 'रामआदेश न्यूज'शी बोलताना अत्यंत कडक भूमिका मांडली. ते म्हणाले की, "फलटण शहराचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीला आम्ही खपवून घेणार नाही. कॅफेच्या नावाखाली अल्पवयीन मुला-मुलींना प्रायव्हेट कप्पे उपलब्ध करून देणे हा कायद्याने गुन्हा आहे. आम्ही केवळ सूचना दिल्या नाहीत, तर यापुढे अशा ठिकाणी थेट गुन्हे दाखल करून परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे."
शहरातील उमाजी नाईक चौक, डेक्कन चौक,गजानन चौक आणि प्रमुख वर्दळीच्या ठिकाणच्या कॅफेंवर पोलिसांनी अचानक धाडी टाकल्या. यावेळी अनेक कॅफेंमध्ये काळ्या काचा, किंवा काचेवरती स्टिकर, पडदे आणि लाकडी केबिन्स आढळून आल्या. पोलिसांनी तात्काळ सर्व कॅफे चालकांना आदेश देऊन काचेवर लावलेले स्टिकर आणि बॅनर काढण्यास सूचना दिल्या. "कॅफेमध्ये कोण बसले आहे आणि काय सुरू आहे, हे बाहेरून आरपार दिसलेच पाहिजे," अशा कडक सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. ज्यांनी नियमांचे उल्लंघन केले, त्यांचे साहित्य जप्त करून त्यांना पोलीस चौकीची हवा दाखवण्यात येणार आहे.
शहराबाहेरील जाधवाडी हद्दीत असलेल्या बिरदेवनगर-विचुर्णी रोडवरील 'ऑरेंज लॉज' वर पोलिसांनी टाकलेल्या धाडीने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या लॉजवर अनैतिक देहाविक्रय (वेश्या व्यवसाय) सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत काही संशयितांना अटक करण्यात आली असून, लॉज मालकावर कडक कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे. या एका कारवाईमुळे तालुक्यातील इतर लॉज मालकांचेही धाबे दणाणले आहेत.
पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे फलटणमधील अवैध धंदे करणाऱ्यांचे 'मार्केट' जाम झाले आहे. नागरिकांनी पोलिसांच्या या तत्परतेचे स्वागत केले असून, "अशीच कारवाई कायम सुरू राहिल्यास फलटण पुन्हा एकदा सुरक्षित होईल," असा विश्वास व्यक्त केला आहे.
प्रशासकीय सूचना: पालकांनीही आपली मुले शाळा-कॉलेजच्या नावाखाली कुठे जातात, यावर लक्ष ठेवावे. संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.