फलटण (प्रतिनिधी):
येथील जायंटस ग्रुप फलटण आणि मुधोजी क्लब फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी १७ वर्षांखालील मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत फलटणसह पाचगणी, बारामती आणि अकलूज येथील नामांकित संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन आणि श्रद्धांजली
सकाळी ९:०० वाजता फलटणच्या माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (ताईसाहेब महाराज) यांच्या हस्ते नारळ फोडून स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेच्या प्रारंभी महाराष्ट्राचे दिवंगत लाडके उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्याबद्दल श्री. गंगावणे सर यांनी माहिती दिली. त्यानंतर उपस्थितांनी एक मिनिट उभे राहून आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
मान्यवरांचे स्वागत
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जायंटस ग्रुपचे अध्यक्ष श्री. निकम सर यांनी प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी मुधोजी क्लबचे डायरेक्टर श्री. महादेवराव माने, सदस्य श्री. सुभाषराव जाधव, बास्केटबॉल कोच श्री. बाळासाहेब बाबर, जायंटस फेडरेशन २-क चे युनिट डायरेक्टर श्री. प्रभाकर भोसले सर, फेडरेशन ऑफिसर श्री. शिरीष शहा, माजी अध्यक्ष श्री. दीपक दोशी आणि अध्यक्ष श्री. शामराव निकम उपस्थित होते.
तसेच जायंटस ग्रुपचे सदस्य श्री. उदय शहा, श्री. विठ्ठलराव माने, श्री. धनाजीराव जाधव, श्री. प्रकाश मोरे, श्री. प्रदीप फडे, श्री. बाबासाहेब गंगावणे, श्री. सुरेश शिंदे, श्री. धनाजीराव घोरपडे, श्री. हणमंतराव घनवट यांच्यासह विविध संघांचे प्रशिक्षक, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चुरशीचे सामने आणि बक्षीस वितरण
सर्व सामने अत्यंत खेळीमेळीच्या आणि चुरशीच्या वातावरणात पार पडले. खेळाडूंनी आपल्या कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विजयी संघ आणि सहभागी खेळाडूंना जायंटस ग्रुपतर्फे मेडल देऊन गौरविण्यात आले.
आभार प्रदर्शन
कार्यक्रमाच्या शेवटी जायंटस ग्रुपचे युनिट डायरेक्टर श्री. प्रभाकर भोसले यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक, शिक्षक आणि मुधोजी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. खेळाडूंच्या पुढील वाटचालीस जायंटस ग्रुप फलटणच्या वतीने शुभेच्छा देऊन स्पर्धेची सांगता करण्यात आली.