गोखळी (वार्ताहर):
"जीवनाच्या प्रत्येक वळणावर माणूस शिकत असतो आणि हे शिक्षणच त्याला ध्येयापर्यंत नेते. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल, तर पुस्तके आणि माणसे वाचायला शिका. वाचनामुळे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणापुढेही झुकत नाही. पुस्तके जगण्याची दिशा देतात, तर माणसे जगायला शिकवतात," असे प्रतिपादन माणदेशी साहित्यिक व रयत सेवक ताराचंद्र आवळे यांनी केले.
गोखळी (ता. फलटण) येथे शहीद भगतसिंग प्रतिष्ठान संचलित स्व. राजेंद्र तात्या भागवत सार्वजनिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित '१३५ ग्रंथ भेट' कार्यक्रमात ते बोलत होते.
मोबाईलच्या मोहात पिढी बरबाद करू नका
कार्यक्रमात बोलताना आवळे यांनी तरुण पिढीला मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले की:
आधुनिकतेच्या नावाखाली मोबाईलमधील 'रील्स'मुळे माणसाचे आयुष्य क्षणभंगुर होत चालले आहे.
केवळ 'वाचाल तर वाचाल' असे म्हणून चालणार नाही, तर मुलांच्या हातातील मोबाईल काढून त्यांना पुस्तकांकडे वळवणे काळाची गरज आहे.
मुले हीच आपली खरी संपत्ती असून, त्यांना योग्य वयात योग्य संस्कार देऊन घडवा.
१३५ पुस्तकांची अनोखी भेट
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून ताराचंद्र आवळे यांनी वाचनालयाला १३५ पुस्तके भेट दिली. यामध्ये कथा, कादंबरी, कविता, आत्मचरित्र आणि स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशा दर्जेदार पुस्तकांचा समावेश आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी व्यासपीठावर नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौ. ऋतुजा जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज गावडे उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते आबा मदने यांनी वाचनाचे महत्त्व विषद केले, तर शाहीर प्रमोद जगताप व सतीश झेंडे यांनी प्रबोधनपर कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश भागवत यांनी केले, तर सूत्रसंचालन राधेश्याम जाधव यांनी केले. या कार्यक्रमास माजी सरपंच रमेश गावडे, अमोल हरिहर, बबलू शिरतोडे, मयूर गावडे, श्रीकांत माने यांसह स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचनालयाला मिळालेल्या या ग्रंथभेटीबद्दल संपूर्ण परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.