दहिवडी ता. माण जिल्हा सातारा येथील दहिवडी कॉलेज दहिवडी मधील उच्च माध्यमिक शिक्षिका श्रीमती देशमुख संगीता यांनी अकरावीच्या विद्यार्थिनींना पेपर हाताळावयास देऊन गोपनीयतेचा भंग केल्याबाबतची माहिती विभागीय मंडळास 25 मार्च रोजी प्राप्त झाली होती. त्यानुसार तातडीने कोल्हापूर विभागीय मंडळाच्या द्विसदसीय समितीने 26 मार्च रोजी दहिवडी येथे भेट देऊन चौकशी केली. त्यामध्ये संबंधित परीक्षक शिक्षिका, उत्तरपत्रिका हाताळणाऱ्या विद्यार्थिनी, संबंधित महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय खेत्रे यांच्याकडे चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले. श्रीमती देशमुख यांनी उत्तरपत्रिका विद्यार्थिनीना हाताळावयास दिल्याचे लेखी जबाबाबत मान्य केले आहे. श्रीमती देशमुख यांचे नियामक यांनी, या उत्तरपत्रिकांमध्ये परीक्षार्थीशिवाय अन्य कोणी ओव्हररायटिंग किंवा अन्य लिखाण केलेले नाही, यामध्ये कोणतेही संशयास्पद बाब आढळून येत नाही असा अहवाल उत्तरपत्रिकांची पुन्हा पाहणी करून दिला आहे. त्यानुसार या विद्यार्थिनींनी केवळ पेपर हाताळले असून उत्तरपत्रिकेवरील कोऱ्या जागांवर लाल पेनाने रेषा मारल्याचे सिद्ध झालेले आहे. तसेच विद्यार्थिनींनी पेपर तपासलेले नाहीत ही बाब स्पष्ट झाली आहे. ज्या वर्गात त्यांनी असे काम केले त्या वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने फुटेज उपलब्ध नाही.
सदर प्रकरणी दोषी परीक्षक यांचे पेपर तपासणीचे संपूर्ण मानधन जप्त करण्याची कार्यवाही विभागीय मंडळाकडून करण्यात येत आहे. तसेच अनधिकृत व्यक्तीस उत्तरपत्रिका हाताळावयास दिल्या असल्याने मंडळ शिक्षासूचीनुसार संबंधित शिक्षण संस्थेस श्रीमती देशमुख यांच्यावर सेवाशर्तीनुसार कारवाई करण्यास कळवण्यात येत आहे. शिवाय या प्रकरणी प्रसार माध्यमातील बातम्यांमध्ये मंडळाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याने श्रीमती देशमुख यांच्याकडे तपासणीसाठी देण्यात आलेल्या सर्व उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन मुख्य नियामक यांच्याकडून मंडळात करण्यात येणार आहे. विभागीय मंडळाच्या आगामी सक्षम समितीत (तदर्थ समितीत) हा विषय ठेवून पुढील कार्यवाही करण्यात येईल. परीक्षार्थींचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल.
-राजेश क्षीरसागर,
विभागीय अध्यक्ष,
कोल्हापूर विभागीय मंडळ.