फलटण : शहराच्या आध्यात्मिक वैभवात भर टाकणाऱ्या रविवार पेठ येथील ऐतिहासिक तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला असून, याचा लोकार्पण व कलशारोहण सोहळा २२ ते २४ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. या मंगलमयी सोहळ्यासाठी संपूर्ण रविवार पेठ सज्ज झाली असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
या सोहळ्याचे नियोजन अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले असून, तीनही दिवस विविध विधी पार पडणार आहेत:
२२ एप्रिल (पहिला दिवस): सकाळी ११ वाजता श्रींची मूर्ती व कलशाचे आगमन होईल. सायंकाळी ५ ते ९ या वेळेत भव्य नगर प्रदक्षिणा व कलश शुभयात्रा काढण्यात येईल. रात्री ९ वाजता दशविध स्नान विधी पार पडतील.
२३ एप्रिल (दुसरा दिवस): दुपारी १२ वाजता महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. दुपारी ४ वाजल्यापासून मुख्य देवता स्थापन पूजन, जलाभिषेक आणि उदक शांती विधी होतील. रात्री ९ वाजता माणकेश्वर भजनी मंडळाचे भजन रंगणार आहे.
२४ एप्रिल (तिसरा दिवस - मुख्य सोहळा): सकाळी १० वाजता वास्तुशांती व हवन होईल. दुपारी ४ वाजता मूर्ती व कलश प्रतिष्ठापना करण्यात येईल. सायंकाळी ५ वाजता महाआरती झाल्यानंतर ६ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे लोकार्पण विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. तर कलशारोहण पुसेगावचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर भूषवतील.
याप्रसंगी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
"रविवार पेठ तालीम गणपती मंडळाने अत्यंत श्रद्धेने मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. गोविंद प्लाझा समोर होणाऱ्या या भव्य सोहळ्याला फलटणकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा." — नितीन चोरमले (अध्यक्ष), किरण शहाणे (उपाध्यक्ष) व मोहनराव पोतेकर (मार्गदर्शक)
हा सोहळा म्हणजे फलटणच्या सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, संपूर्ण परिसरात सध्या चैतन्याचे वातावरण आहे.