फलटण (प्रतिनिधी): भारत आणि न्यूझीलंड यांच्यात काल पार पडलेल्या अटीतटीच्या T-20 सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. या विजयाचे पडसाद फलटण शहरात मोठ्या उत्साहात उमटले असून, काल रात्री फलटणमध्ये जणू दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सामन्याचे महत्त्व लक्षात घेता, फलटणमधील क्रीडाप्रेमींमध्ये सकाळपासूनच कमालीची उत्सुकता दिसून येत होती. सामन्याच्या तयारीसाठी तरुणाईची लगबग सुरू होती. शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या मुधोजी क्लब येथे मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. तसेच डियर चौक आणि शहरातील इतर प्रमुख चौक, गल्लीबोळांमध्ये नागरिकांनी आणि तरुण मंडळांनी स्क्रीन लावून सामना पाहण्याची चोख व्यवस्था केली होती.
सामना जसजसा रंगत गेला, तसतशी चाहत्यांची गर्दी वाढत गेली. मुधोजी क्लब आणि डियर चौकात तर पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती. प्रत्येक चौकार आणि षटकारावर होणारा शिट्ट्यांचा आणि टाळ्यांचा कडकडाट संपूर्ण शहरात घुमत होता. आबालवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सर्वजण टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी एकवटले होते.
शेवटच्या चेंडूवर भारताने विजय निश्चित करताच संपूर्ण फलटण शहर आनंदाने वेडे झाले. तरुणांनी हातात तिरंगा घेऊन दुचाकी रॅली काढली. 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिशबाजी केली. आकाशात उमटणारे विविध रंग आणि फटाक्यांच्या आवाजा मुळे कालची रात्र दिवाळीच्या रात्रीपेक्षा कमी नव्हती. "भारताचा विजय हा आमच्यासाठी सणासारखाच आहे," अशा भावना यावेळी काही तरुणांनी व्यक्त केल्या.
हा विजय आणि फलटणकरांचा उत्साह पाहता, क्रिकेट हे आजही भारतीयांना जोडणारा सर्वात मोठा धागा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.