कराड | प्रतिनिधी:
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कराड येथील प्रीतीसंगमावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
यशवंतरावांचे विचार हेच आमचे शक्तीस्थान - सुनेत्रा पवार
यावेळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ हे नेहमीच आमच्यासाठी 'शक्ती स्थळ' राहिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हे श्रद्धास्थान असून त्यांनी नेहमीच यशवंतरावांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम केले आहे. मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर २ फेब्रुवारीला येथे आले होते आणि आज जयंतीनिमित्त पुन्हा आशीर्वाद घेण्यासाठी आले आहे. आगामी काळात त्यांच्याच प्रगत विचारांवर आधारित काम करण्याचा आमचा मानस आहे."
'शब्द सुरांच्या' माध्यमातून आदरांजली
जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली' या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमालाही सुनेत्रा पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. या कार्यक्रमाद्वारे यशवंतरावांच्या जीवनकार्याचा वेध घेण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रीतीसंगम परिसर आज 'यशवंतराव चव्हाण अमर रहे' च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.