कोल्हापूर विभागीय मंडळाची कारवाई: १२५ उत्तरपत्रिकांची तज्ज्ञांकडून पुन्हा होणार तपासणी; दोषी परीक्षकाचे मानधन जप्त, कठोर कारवाईचे संस्थेला निर्देश
बोर्ड परीक्षेत प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका यांची गोपनीयता परीक्षेचा कणा असतो. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूल (केंद्र क्र. १०११) येथे या गोपनीयतेशी खेळ झाल्याची तक्रार समोर आल्याने खळबळ उडाली होती. 'दहावीचे पेपर सहावीच्या विद्यार्थिनींनी तपासले' अशा आशयाचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळाने अत्यंत गांभीर्याने चौकशी करून या प्रकरणातील वस्तुस्थिती चौकशीनंतर प्रकटनाद्वारे जाहीर केली आहे.
विभागीय मंडळाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत प्रकटनानुसार, विद्यार्थिनींनी पेपर तपासल्याचा आरोप तथ्यहीन ठरला असला तरी, उत्तरपत्रिकांसारखी संवेदनशील कागदपत्रे अनधिकृत व्यक्तींच्या हाती सोपवल्याबद्दल संबंधित परीक्षकावर कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
तक्रारीचे स्वरूप आणि खळबळजनक आरोप-
फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या दहावीच्या परीक्षेदरम्यान, विडणी येथील केंद्रावरील गैरप्रकारांबाबत ४ मार्च २०२६ रोजी दूरध्वनीद्वारे मंडळाकडे पहिली तक्रार प्राप्त झाली. त्या शाळेचे शिपाई मंगेश अंभग यांनी केलेल्या या तक्रारीत दोन गंभीर दावे करण्यात आले होते. पहिला दावा असा होता की, मराठी विषयाचे परीक्षक वैभव शेंडे यांनी इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासून घेतल्या. दुसरा दावा हिंदी विषयाचे शिक्षक धनाजी नेरकर यांच्या संदर्भात होता. ते परीक्षेच्या वेळी केंद्रावर उपस्थित राहून काहीतरी संशयास्पद हालचाली करत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. ७ मार्च रोजी ही तक्रार लेखी स्वरूपात ईमेलद्वारे त्यांच्याकडून प्राप्त झाली होती.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी तातडीने सूत्रे हलवली. सुरुवातीला शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद सातारा यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली. मात्र, या प्रकरणातील चौकशी अपूर्ण वाटल्याने, विभागीय मंडळाने १३ मार्च २०२६ रोजी स्वतःच्या द्विसदस्यीय समितीमार्फत प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन फेरचौकशी केली. या समितीने परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज, हजेरी पत्रके, दैनंदिन नोंदणी आणि संबंधित सर्व शिक्षकांचे जबाब नोंदवून घेतले.
चौकशीतील वास्तव: रेषांचा घोळ आणि नियमांची पायमल्ली-
विभागीय मंडळाच्या सखोल चौकशीतून जे वास्तव समोर आले, पुढीलप्रमाणे आहे:
१. उत्तरपत्रिकांवरील रेषांचे सत्य:
मराठीचे परीक्षक वैभव शेंडे यांनी आपल्या लेखी जबाबात एक चूक कबूल केली आहे. त्यांनी १०वीच्या उत्तरपत्रिकांमधील जी पाने परीक्षार्थ्यांनी कोरी सोडली होती, त्यावर लाल शाईच्या पेनाने 'रेषा' मारण्याचे काम इयत्ता सहावीच्या दोन विद्यार्थिनींकडून करून घेतले होते. नियमानुसार, उत्तर पत्रिकेत कोऱ्या राहिलेल्या पानांवर स्वतः परीक्षार्थी, परीक्षेच्या वेळी वर्गात असलेले पर्यवेक्षक किंवा ज्यांच्याकडे पेपर तपासणीसाठी जातात (परीक्षक/नियामक) त्यांनी अशा रेषा मारणे बंधनकारक असते. यामागील मुख्य उद्देश असा असतो की, उत्तरपत्रिका जमा झाल्यानंतर त्यात नंतर कोणीही कोणताही मजकूर लिहून फेरफार करू नये. मात्र, हे काम परीक्षकाने स्वतः न करता विद्यार्थिनींकडून करून घेतले. प्रत्यक्ष छाननीमध्ये या उत्तरपत्रिकांवर केवळ रेषा मारण्याव्यतिरिक्त कोणताही बदल किंवा गुणदान केल्याचे आढळले नाही. म्हणजेच, पेपर विद्यार्थिनींनी तपासले नव्हते, पण त्यांनी ते हाताळले होते.
२. हिंदी विषयाबाबतचा संशय फोल:
हिंदी विषयाचे शिक्षक धनाजी नेरकर यांच्यावरील आरोपांची जेव्हा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासणी करण्यात आली, तेव्हा सत्य समोर आले. ४ मार्च रोजी हिंदीच्या पेपरवेळी नेरकर हे केंद्रसंचालकांच्या सूचनेनुसार केवळ सुरुवातीला विद्यार्थ्यांना तपासणी करून वर्गात सोडण्याच्या कामासाठी उपस्थित होते. प्रत्यक्ष पेपर सुरू होण्यापूर्वीच, म्हणजे सकाळी १०.५२ वाजता त्यांनी केंद्र सोडल्याचे पुराव्यांवरून सिद्ध झाले. त्यामुळे त्यांच्यावरील गैरप्रकाराचे आरोप निराधार ठरले.
दोषी परीक्षकावर कडक कारवाईचा बडगा-
मंडळाच्या नियमानुसार, उत्तरपत्रिका ही अत्यंत गोपनीय कागदपत्रे आहेत. ती परीक्षकाव्यतिरिक्त कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीच्या हाती लागणे हा एक गंभीर अपराध मानला जातो. या प्रकरणात वैभव शेंडे यांनी गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका ठेवत मंडळाने खालील कारवाई केली आहे:
मानधन जप्ती: मंडळ शिक्षासूची परिशिष्ट भाग-१ मधील तरतुदींनुसार, वैभव शेंडे यांचे उत्तरपत्रिका तपासणीचे संपूर्ण मानधन जप्त करण्यात आले आहे.
प्रशासकीय कारवाई: परीक्षक शेंडे हे खाजगी अनुदानित शिक्षण संस्थेचे कर्मचारी आहेत त्यांना लागू असलेल्या महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी नियमावली १९८१ नुसार, संबंधित शैक्षणिक संस्थेला शेंडे यांच्यावर तात्काळ प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांचे हित आणि फेरतपासणीचा निर्णय-
पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात कोणतीही शंका राहू नये, यासाठी विभागीय मंडळाने अत्यंत पारदर्शक पाऊल उचलले आहे. या प्रकरणातील शेंडे यांनी तपासलेल्या १२५ उत्तरपत्रिका नियामकांमार्फत (Moderators) ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या सर्व उत्तरपत्रिकांची आता विभागीय मंडळ स्तरावर तज्ज्ञ परीक्षकांकडून पुन्हा तपासणी केली जाणार आहे. "कोणत्याही परीक्षार्थ्याचे एक गुणाचेही नुकसान होणार नाही आणि निकालात पूर्ण पारदर्शकता राखली जाईल," अशी ग्वाही विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी दिली आहे.
सतर्कता आणि खबरदारीची गरज-
जरी या प्रकरणात प्रत्यक्ष पेपर तपासणीचा गैरप्रकार झाला नसला, तरी परीक्षकाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाने ज्या वेगाने आणि पारदर्शकतेने ही चौकशी पूर्ण केली, त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. मात्र, भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून सर्व केंद्रांना आणि परीक्षकांना कडक नियमांचे पालन करण्याच्या सूचना पुन्हा एकदा देण्यात आल्या आहेत.
या चौकशी व कारवाईनंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा जीव भांड्यात पडला असून, मंडळाच्या कारवाईने सत्य परिस्थिती समोर आली आहे.