पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अशातच, दादांच्या कार्याचा वारसा जतन करण्यासाठी बारामती येथे होणाऱ्या त्यांच्या नियोजित स्मारक परिसरास 'अजित गड' या नावाने संबोधावे, अशी मागणी राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांनी केली आहे.
गडकिल्ल्यांप्रती दादांचे प्रेम हीच खरी ओळख
ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे वंशज आणि गडदुर्ग संवर्धन ट्रस्टचे कार्याध्यक्ष असलेल्या दिपकराजे शिर्के यांनी ही मागणी करताना दादांच्या दुर्गप्रेमाचा दाखला दिला. ते म्हणाले की, "दादांनी अर्थमंत्री म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील प्रमुख पंचस्थळांच्या (पुरंदर, संगमेश्वर, धर्मवीरगड, तुळापूर आणि वढू बुद्रुक) सुशोभीकरणासाठी आणि स्मारकांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी त्यांनी स्वतंत्र 'गडकिल्ले संवर्धन सेल' स्थापन केला होता."
कार्यकर्त्यांच्या भावनांना साद
अजितदादांचे औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान अफाट आहे. त्यांची किल्ल्यांबद्दलची अस्मिता आणि कामाचा झपाटा पाहता, त्यांच्या स्मारकाला 'गड' हे नाव देणे सयुक्तिक ठरेल, असे शिर्के यांनी नमूद केले. या संदर्भात ते लवकरच उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
"ज्याप्रमाणे दादांनी गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आयुष्यभर साथ दिली, त्याचप्रमाणे त्यांचे स्मारक हे भावी पिढीला प्रेरणा देणारा एक 'अभेद्य गड' ठरावा, हीच सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे."
— दिपकराजे शिर्के (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी माजी सैनिक सेल)