सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेली धक्काबुक्की आणि पोलिसांच्या अरेरावीचे पडसाद आज थेट विधिमंडळात उमटले. शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनी सभागृहात आपला तीव्र संताप व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानपरिषदेच्या सभापतींनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
सभागृहात बोलताना शंभुराज देसाई अत्यंत आक्रमक झाले होते. त्यांनी पोलिसांच्या वागणुकीवर जोरदार टीका केली. आम्हाला १०-१० पोलीस मिळून ओढत होते. कोणी दंडाला, कोणी पायाला तर कोणी कमरेला पकडले होते. एखाद्या गुन्ह्यातील सराईत आरोपीला पकडतात, तसे पोलीस मंत्र्यांना धरून खेचत होते, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. मकरंद पाटील आणि मी स्वतः, आम्हाला खेचणाऱ्या त्या पोलिसांना चेहरे बघून ओळखू शकतो, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
शंभुराज देसाई यांनी केवळ सध्याच्या घटनेवरच नव्हे, तर तुषार दोशी यांच्या जुन्या कारकीर्दीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अंर्तवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला, तेव्हा तिथे प्रचंड उद्रेक होता. त्या गोळीबार आणि लाठीमार प्रकरणानंतर तुषार दोशींना जालन्यातून का हटवण्यात आले? त्यांचा जुना ट्रॅक रेकॉर्ड तपासा, अशी मागणी देसाई यांनी केली. तसेच, रेल्वे पोलीस दलातील कर्मचारी साताऱ्यात आणून बसवण्यामागे नेमके काय 'उद्योग' सुरू आहेत, असा बोचरा सवालही त्यांनी उपस्थित केला.
केवळ पोलीस अधीक्षकच नव्हे, तर त्यांच्या सांगण्यावरून काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांवरही कारवाईची मागणी मंत्र्यांनी केली आहे. यात प्रामुख्याने:
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता निवृत्त न्यायाधीशांमार्फत केली जाणार आहे. या चौकशीत तुषार दोशींच्या साताऱ्यातील गेल्या वर्षभराच्या कामाची आणि त्यांच्या मागील रेकॉर्डचीही सखोल चौकशी व्हावी, असा आग्रह शंभुराज देसाई यांनी धरला आहे.