शिक्षक वैभव शेंडे आणि या घटनेची माहिती/व्हिडिओ माध्यमांना देणारे शिपाई मंगेश अभंग या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.
फलटण (प्रतिनिधी): फलटण तालुक्यातील विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीत झालेल्या कथित गैरप्रकाराने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणी शाळेने आता कठोर पाऊल उचलले असून, सहावीच्या विद्यार्थिनींकडून पेपर तपासायला लावल्याचा आरोप असलेले शिक्षक वैभव शेंडे आणि या घटनेची माहिती/व्हिडिओ माध्यमांना देणारे शिपाई मंगेश अभंग या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.
२६ फेब्रुवारी रोजी उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये दहावीचे मराठी विषयाचे पेपर तपासण्याचे काम सुरू होते. यावेळी शिक्षक वैभव शेंडे यांनी या कामात सहावीतील दोन विद्यार्थिनींची मदत घेतल्याचा आरोप झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. दहावीच्या उत्तरपत्रिकांची गोपनीयता धोक्यात आल्याने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
शाळा व्यवस्थापनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षक आणि शिपाई या दोघांनाही ४ महिन्यांसाठी निलंबित केले आहे.
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक शेंडे हे मुलींकडून पेपर तपासून घेत नव्हते, तर केवळ उत्तरपत्रिकेतील मोकळ्या जागी रेषा मारण्याचे काम त्यांच्याकडून करून घेतले जात होते. तरीही, या प्रक्रियेत बाहेरील व्यक्तींचा समावेश करणे हा नियमांचा भंग असल्याने शिक्षकावर कारवाई करण्यात आली. तर, अंतर्गत बाबी अधिकृत तक्रार करण्याऐवजी थेट सार्वजनिक केल्यामुळे शिपायावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
दहावीच्या उत्तरपत्रिकांसारख्या संवेदनशील विषयात शाळेने घेतलेल्या या दुहेरी निर्णयामुळे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. एका बाजूला नियमांचे उल्लंघन आणि दुसऱ्या बाजूला शिस्तभंग अशा दोन्ही मुद्द्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. आता या प्रकरणात शिक्षण विभाग नेमकी काय भूमिका घेणार आणि या चौकशीतून नेमके काय सत्य बाहेर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.