अतिक्रमणे काढताना राजे गटाने माणुसकी जपली. गरिबांना रस्त्यावर आणण्यापूर्वी त्यांचे सुरक्षित पुनर्वसन करण्यात आले. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्याच जागेतील काही हिस्सा देऊन मनाचा मोठेपणा दाखवला आणि सर्वांना हक्काचे गाळे दिले.
फलटण (प्रतिनिधी): फलटण नगरपरिषद हद्दीतील मुख्य रस्ते, चौक आणि वर्षानुवर्षे ओळखल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या वास्तूंची नावे बदलण्याचा घाट सध्या नगरपरिषद प्रशासनाने घातला आहे. महापुरुषांची किंवा समाजसुधारकांची नावे देणे ही बाब स्वागतार्ह असली, तरी राजकीय स्वार्थापोटी प्रस्थापित आणि ऐतिहासिक वारसा असलेली नावे पुसून टाकण्याचा प्रयत्न म्हणजे 'दुसऱ्याच्या कामावर डोळा ठेवून स्वतःचे नाव मिरवण्याचा' प्रकार असल्याची टीका आता शहरात जोर धरू लागली आहे.
राजकीय द्वेषापोटी विकासाचा वारसा पुसण्याचा प्रयत्न?
नगरपरिषदेने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, अनेक महत्त्वाच्या इमारती आणि परिसरांची नावे बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराजा मालोजीराव नाईक निंबाळकर भवन, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृह, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सभागृह, श्रीमंत रामराजे शॉपिंग सेंटर आणि बारामती चौक यांसारख्या नावांचा समावेश आहे. ज्या नेत्यांनी आणि घराण्याने फलटणचा कायापालट केला, ती नावे बदलण्याचे हे 'कटू राजकारण' कशासाठी? असा जळजळीत सवाल उपस्थित केला जात आहे.
श्रीमंत रामराजे शॉपिंग सेंटर: अतिक्रमिग्रस्तांच्या पुनर्वसनाचा 'फलटण पॅटर्न'
ज्या 'श्रीमंत रामराजे शॉपिंग सेंटर'चे नाव बदलण्याचा घाट घातला जात आहे, त्याचा इतिहास अत्यंत प्रेरणादायी आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा अतिक्रमण हटावची मोठी मोहीम सुरू होती, तेव्हा सातारा जिल्ह्यातील अनेक गोरगरिबांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले होते. मात्र, फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते पृथ्वी चौक दरम्यानची अतिक्रमणे काढताना राजे गटाने माणुसकी जपली. गरिबांना रस्त्यावर आणण्यापूर्वी त्यांचे सुरक्षित पुनर्वसन करण्यात आले. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्याच जागेतील काही हिस्सा देऊन मनाचा मोठेपणा दाखवला आणि सर्वांना हक्काचे गाळे दिले. केवळ जनतेच्या हट्टामुळे आणि त्यांच्यावरील प्रेमापोटी या संकुलाला त्यांचे नाव देण्यात आले होते. अशा लोकोपयोगी कामाचा वारसा पुसणे हे कृतघ्नपणाचे लक्षण आहे.
संजीवराजे नगर: ९० च्या दशकातील जनभावनेवर घाला
संजीवराजे नगर या भागाला हे नाव ९० च्या दशकात पडले आहे, जेव्हा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे वय अवघे १६ ते २० वर्षे होते. तेव्हापासून ही ओळख जनतेच्या मनात घट्ट आहे. आता इतक्या वर्षांनंतर हे नाव बदलण्याचा प्रयत्न करणे म्हणजे केवळ राजकीय 'जलन' आणि द्वेष आहे. नाव बदलण्यापेक्षा विकासाचे राजकारण करा, असा सल्ला संतप्त नागरिक देत आहेत.
जनतेने विकासकामे करण्यासाठी निवडून दिलेले असताना, केवळ जुनी नावे बदलून स्वतःचे वर्चस्व सिद्ध करणे हे लोकशाहीला धरून नाही. "केसाने गळा कापण्यापेक्षा" प्रशासनाने स्वतःची नवीन विकासकामे उभी करून दाखवावीत. ज्यांनी वर्षांनुवर्षे फलटणच्या विकासात रक्त आटवले, त्यांची नावे पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना "येणारा काळ तुमची जागा नक्कीच दाखवून देईल", अशा शब्दांत संताप व्यक्त होत आहे.
२५ मार्चच्या सर्वसाधारण सभेकडे लक्ष!
दरम्यान, या सर्व वादग्रस्त विषयांवर निर्णय घेण्यासाठी फलटण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा बुधवार, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेत फलटणच्या इतिहासातील आणि विकासातील महत्त्वाची नावे बदलण्यावर शिक्कामोर्तब होणार की जनभावनेचा विचार करून हा प्रस्ताव फेटाळला जाणार, याकडे आता संपूर्ण फलटणकरांचे लक्ष लागले आहे. जर तुम्ही झालेल्या कामांची नावे बदलत असाल तर येणारा काळ तुम्हाला तुमची जागा नक्कीच दाखवून देईल, असा इशारा जनतेने दिला आहे.