सातारा जिल्हा परिषदेत सत्तासंघर्षाचा 'हायव्हल्टेज' ड्रामा! भाजपचे स्वप्न भंगणार? शिंदेंचा 'ग्रीन सिग्नल' अन् राष्ट्रवादीचे सदस्य 'नॉट रिचेबल'
सातारा: राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निकालानंतर आता सर्वांच्या नजरा साताऱ्याच्या 'मिनी मंत्रालया'कडे वळल्या आहेत. सातारा जिल्हा परिषदेचा निकाल त्रिशंकू लागल्याने सत्ता स्थापनेसाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येत सत्ता स्थापन करण्यासाठी 'ग्रीन सिग्नल' दिल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे.
सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झालेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने आपली तटबंदी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे २० निवडून आलेले सदस्य आणि त्यांना पाठिंबा देणारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा १ सदस्य अशा एकूण २१ जणांना साताऱ्याबाहेर सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सध्या यातील बहुतांश सदस्यांचे फोन 'नॉट रिचेबल' किंवा 'स्विच ऑफ' येत असल्याने साताऱ्यात 'रिसॉर्ट पॉलिटिक्स' सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. कोणत्याही परिस्थितीत आपला गट फुटू नये, यासाठी राष्ट्रवादीने ही मोठी खबरदारी घेतल्याचे बोलले जात आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या एकूण ६५ जागांपैकी भाजपने २७ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. मात्र, बहुमतासाठी आवश्यक असलेला ३३ हा आकडा गाठताना भाजपची दमछाक होताना दिसत आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० जागा आणि शिवसेनेच्या १६ जागा एकत्र आल्यास हा आकडा ३६ वर पोहोचतो, जो बहुमतासाठी पुरेसा आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका सदस्याची साथ मिळाल्यास हे पारडे अधिक जड होणार आहे. त्यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 'दाराआड' बैठकांचे सत्र सुरू झाले असून सत्ता स्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे.
एकिकडे शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा रंगली असताना, भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी मात्र जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. भाजपचे स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न सध्यातरी धूसर दिसत असले, तरी गोरे यांच्या वक्तव्यामुळे साताऱ्याच्या राजकारणातील रंगत वाढली आहे. २७ जागा खिशात असलेल्या भाजपला केवळ ६ जागांची गरज आहे, तर दुसरीकडे ३७ च्या आकड्यावर डोळा ठेवून असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी युतीचा मार्ग सध्या मोकळा दिसत आहे.
शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील या दोन दिग्गज मंत्र्यांनी एकत्र येत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने साताऱ्यातील सत्तेचे समीकरण आता मुंबईतून ठरले असल्याचे स्पष्ट होत आहे. आकड्यांचा खेळ, सदस्यांचे 'अंडरग्राउंड' होणे आणि मंत्र्यांच्या गुप्त बैठका यामुळे साताऱ्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. येणाऱ्या काही दिवसांत साताऱ्याच्या जिल्हा परिषदेवर कोणाचा गुलाल उधळला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.