सातारा/फलटण: गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकारणात लागलेली उत्कंठा अखेर संपली आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी प्रशासनाने २० मार्च २०२६ हा दिवस निश्चित केला असून, सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सभागृहात ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडीसोबतच जिल्ह्यातील फलटणसह सर्व ११ पंचायत समित्यांच्या सभापती निवडीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे.
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात फलटण तालुक्याला नेहमीच अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. १६ मार्च रोजी होणाऱ्या फलटण पंचायत समिती सभापती निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी प्रत्येक सदस्याचे मत महत्त्वाचे ठरणार असल्याने, फलटणमधील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.
यंदाचे जिल्हा परिषद अध्यक्षपद 'मागासवर्गीय महिला' (OBC महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे. यामुळे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांतील पात्र महिला उमेदवारांच्या नावांची चर्चा रंगू लागली आहे. 'कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार?' यावरून फलटणच्या चावडीवर आतापासूनच पैजा लागण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात सध्या भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात काट्याची टक्कर आहे. कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने 'त्रिशंकू' परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासकीय तयारी पूर्ण:
"निवडणुकी संदर्भातील अधिकृत नोटिसा ६ मार्च रोजीच तहसीलदारांकडे बजावणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे," अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे.
आता १६ तारखेला पंचायत समित्यांचा गुलाल कोण उधळणार आणि २० मार्चला साताऱ्याच्या 'मिनी मंत्रालया'वर कोणाचा झेंडा फडकणार, याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.