फलटण (प्रतिनिधी):फलटण तालुक्यामध्ये सध्या अवैध मुरूम आणि माती उत्खननाचा प्रश्न गंभीर झाला असून, पर्यावरणासह शासनाच्या महसुलाची मोठी लूट सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या बेकायदेशीर व्यवसायावर तातडीने लगाम लावावा, या मागणीसाठी डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (D.P.I.) च्या वतीने फलटण तहसीलदार साहेबांना आज जणजणीत निवेदन देऊन कारवाईचा अल्टिमेटम देण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात ठिकठिकाणी रात्रीच्या वेळी आणि दिवसाढवळ्याही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे मुरूम आणि माती उपसा सुरू आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
१. तालुक्यातील सर्व संशयास्पद उत्खनन स्थळांची तात्काळ पाहणी करावी.
२. अवैध वाहतूक करणारी वाहने जप्त करून संबंधित गुंडांवर व मालकांवर गुन्हे दाखल करावेत.
३. रात्रीच्या वेळी विशेष पथके नेमून कडक तपासणी मोहीम राबवावी.
D.P.I. चे जिल्हा युवा अध्यक्ष मंगेश आवळे, फलटण तालुका अध्यक्ष निलेश घोलप आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, येत्या ८ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन, शांततापूर्ण धरणे आणि 'रास्ता रोको' करण्यात येईल. तसेच, अवैध वाहतुकीचे पुरावे (फोटो/व्हिडिओ) पक्षाकडून थेट प्रशासनाला दिले जातील.
जर या आंदोलनादरम्यान काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सातारा, पोलीस उपअधीक्षक आणि जिल्हा खनिज अधिकारी यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आली आहे.
यावेळी रोहित अडिगळे, आदित्य पाटोळे यांसह पक्षाचे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या 'माती माफियांवर' तहसीलदार काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.