फलटण: प्रतिनिधी जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर गिरवी (ता. फलटण) येथील सुपुत्राने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत विशाल नारायण वाघ यांनी पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी राज्यात प्रथम क्रमांक पटकावून फलटण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे, विशाल यांच्यासोबतच त्यांच्या भगिनी धनश्री वाघ यांनीही राज्यसेवेत यश मिळवल्याने वाघ कुटुंबाच्या आनंदाला उधाण आले आहे.
विशाल वाघ यांचे यश केवळ एका पदापुरते मर्यादित नाही. याच परीक्षेच्या सप्टेंबर महिन्यात जाहीर झालेल्या निकालात त्यांची राज्य कर निरीक्षक (STI) पदासाठीही राज्यात २८ व्या क्रमांकाने निवड झाली आहे. एकाच वेळी दोन महत्त्वाच्या पदांवर निवड होऊन विशाल यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. सध्या त्यांचे राज्य कर निरीक्षक पदाचे प्रशिक्षण मुंबई येथील माझगाव येथे पूर्ण झाले असून, पुढील २०-२५ दिवसांत ते सेवेत रुजू होणार आहेत. त्यानंतर सहा-सात महिन्यांनी ते पोलिस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण पूर्ण करून खाकी वर्दीत जनसेवेसाठी सज्ज होतील.
विशाल यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गिरवी येथील जिल्हा परिषद शाळा व छत्रपती शिवाजी विद्यालयात झाले. उच्च माध्यमिक शिक्षण फलटणच्या मालोजीराजे शेती महाविद्यालयात, तर पदवीचे शिक्षण कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयात २०२१ मध्ये पूर्ण झाले. गेल्या ४-५ वर्षांपासून त्यांनी एमपीएससीचा कठोर अभ्यास सुरू ठेवला होता. पोलिस उपनिरीक्षक पदासाठी आवश्यक असलेल्या शारीरिक चाचणीची तयारी त्यांनी फलटण येथील 'योद्धा करिअर ॲकॅडमी'च्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली.
विशाल यांच्या यशात त्यांच्या भगिनी धनश्री वाघ यांनीही मोलाची साथ दिली आहे. धनश्री यांनी राज्यसेवा परीक्षेत निरीक्षण अधिकारी (पुरवठा) पदावर यश मिळवले आहे. एकाच घरातून दोन भावंडांनी राज्याच्या राजपत्रित सेवांमध्ये स्थान मिळवल्याने गिरवी ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे.
"माझ्या आई-वडिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आम्हाला शिक्षण दिले. त्यांच्या कष्टाचे आज चीज झाले आहे. हे यश मी माझ्या आई-वडिलांना समर्पित करतो."
— विशाल नारायण वाघ (राज्यात प्रथम, PSI)
आई-वडील आणि आजी यांच्या डोळ्यांत आज आनंदाश्रू आहेत. मुलांच्या या घवघवीत यशामुळे गिरवी गावासह संपूर्ण फलटण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रशासकीय सेवेत रुजू होऊन समाजाची सेवा करण्याचा मानस विशाल यांनी व्यक्त केला आहे.