फलटण :-जनतेने ठरवावं ,पाणी चोर कोण? साव कोण?निरा देवघरचं काम युतीच्या काळात सुरू झालं .अनुशेषामुळे काम मंद गतीने झाले. 2013 ला आ. रामराजेंनी या कामासाठी प्रशासकीय मान्यता घेतली होती. 2014 ला सत्तेवर आलेल्या फडवणीस (की फसवणीस) यांनी ते टेंडर रद्द केले. 2019 ला नव्याने आपले सरकार आल्यानंतर हे काम प्रस्तावित केले. पुढे सरकार कोसळल्यानंतर लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून माजी खासदारांनी टेंडर काढायला लावले.ते काढलेले टेंडर रद्द झाले आहे. निरादेवघरच्या पाणी प्रश्नावरून माजी खासदारांनी जनतेची फसवणूक केली आहे. एवढेच नाही तर लोकसभा निवडणुकीत मतं मिळावीत म्हणून निरा देवघरचं वाचणारे 3 टीएमसी पाणी माजी खासदारांनी लाभक्षेत्राबाहेरील माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्याला मिळावे अशी मागणी केली होती. लोकसभेला भूमिपुत्र म्हणून ज्या जनतेने मतं दिली त्या जनतेशी माजी खासदारांनी कृतघ्नता दाखविल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आ. दीपक चव्हाण यांनी केला. विडणी ता. फलटण येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे चेअरमन रघुनाथ राजे ना. निंबाळकर, महादेवराव पवार ,अनिकेतराजे, विश्वजीतराजे, सह्याद्री कदम, महेंद्र सूर्यवंशी, बाळासाहेब शेंडे यांची उपस्थिती होती.आ. चव्हाण पुढे म्हणाले माजी खासदारांनी दुसऱ्या तालुक्यांना पाणी देण्याचा घाट घातला होता तर अजित पवारांनी वीर धरणातून बारामतीसाठी 2 टीएमसी पाणी मागितले. यालाही आम्ही कडाडून विरोध केला. बारामतीकरांना पाणी चोर म्हणणारे आता कुठे आहेत? आता जनतेने ठरवायचं पाणी चोर कोण ?आणि साव कोण? तालुक्यात दहशतवाद गुंडगिरीचे राजकारण चालले आहे. जनतेला नाहक त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांनो निवडणूक होऊ द्या बघतोच.. असा सज्जड दम पहिल्यांदाच आ. दीपक चव्हाण यांनी दिला . संजीवराजे म्हणाले फलटण कोरेगाव मतदार संघात आ. रामराजे आ. दीपक चव्हाण यांनी शेतीपाणी प्रश्न, शिक्षण, उद्योग सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. तालुक्याचा चौफेर विकास सुरू आहे. गावोगावी प्रचंड विकास कामे उभी राहिलेली आहेत.आ. दीपक चव्हाण हे एक कार्य कुशल व निगर्वी आमदार आहेत. जनतेशी प्रामाणिक, नेतृत्वाशी एकनिष्ठ, विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी सतर्क, कोणाशीही आकस नाही. असं हे नेतृत्व आहे. राखीव आमदार चौथ्यांदा निवडणूक लढवीत आहेत. चांगले काम करत आहेत. राज्यांमध्ये अनेक ठिकाणी चार -चार, पाच-पाच, सात -आठ वेळा निवडणूक लढविणारे आहेत त्यांना कोणी थांबा म्हणत नाही. इथे राखीव आमदार आहे म्हणून त्यांना थांबा असं का म्हणायचं.आम्ही आजवर प्रेमाने माणसं जिंकलीत ती आमच्या जवळ आहेत. दमदाटीने आम्ही कोणाला जवळ घेत नाही. तालुक्यात सुरू असलेल्या दबाव, दमदाटी, दहशतीच्या राजकारणावर चिंता व्यक्त करून संजीवराजे पुढे म्हणाले. प्रत्येकाने आपली मतदारापुढे भूमिका मांडावी. निर्णय घ्यायला मतदार सक्षम आहेत. आडवा आडवीचे राजकारण थांबायला हवे. महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अधिक सशक्तपणे राबवली जाईल खऱ्या अर्थाने महिलांच्या सशक्तिकरणासाठी खासदार शरद पवार यांनी प्रत्यक्ष कार्य केला आहे. त्यांच्या पुढाकारामुळेच महिलांना सर्वच क्षेत्रात संधी उपलब्ध झाल्या. सर्वच क्षेत्रात महिला अधिकार गाजवित आहेत तर राजकीय क्षेत्रातही महिला कर्तृत्व गाजवत आहेत त्याचं श्रेय शरद पवार यांचेच आहे.यावेळी विश्वजीत राजे सह्याद्री कदम बजरंग खटके अनिल जगताप शंभूराज खलाटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. रघुनाथराजे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करून आभार व्यक्त केले.विडणी येथील जाहीर सभेस प्रकृती अस्वास्थ्यामुळे येता न आलेल्या खा.अमोल कोल्हे यांनी मोबाईलद्वारे मतदारांशी संवाद साधताना म्हटले संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीची लाट आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षाला हद्दपार करण्याचे मतदारांनी ठरवले आहे.फलटणमध्ये विरोधी पक्षाचे घड्याळ चिन्ह हे पवार साहेबांच्या कडून चोरलेले आहे .चोरलेली गोष्ट कधी अभिमानाने मिरवता येत नाही. शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी दीपक चव्हाण यांना मताधिक्यांनी विजयी करा. आपल्या सर्वांच्या सहकार्याने दीपक चव्हाण आमदारकीचा चौकार मारतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.