सातारा: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकीय आखाड्यात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीत भाजपने 'महायुतीचा धर्म' धाब्यावर बसवल्याचा आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आता भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वज्रमुठ आवळली आहे. मंगळवारी साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गुप्त बैठकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र सत्ता स्थापन करण्याचा खळबळजनक निर्णय घेतला आहे.
भाजपच्या 'हस्तक्षेपा'चा वचपा काढणार!
निवडणुकीपूर्वी भाजपने स्वबळाचा नारा देत महायुतीमधील मित्रपक्षांच्याच मतदारसंघात उघडपणे हस्तक्षेप केला होता. विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने दिलेले आव्हान नेत्यांच्या जिव्हारी लागले आहे. "भाजपने आम्हाला गृहीत धरले, आता आम्ही त्यांना सत्तेबाहेर ठेवणार," असा आक्रमक पवित्रा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री मकरंदआबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील आणि संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यावर सविस्तर चर्चा झाली.
असे जुळणार बहुमताचे 'मॅजिक फिगर'
साताऱ्याच्या ६५ जागांच्या जिल्हा परिषदेत सत्तेसाठी ३३ सदस्यांची आवश्यकता आहे. भाजप २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, बहुमतापासून तो अजूनही दूर आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी-स्वाभिमानी आघाडीकडे २१ आणि शिवसेनेकडे १५ सदस्य आहेत. या दोन्ही शक्ती एकत्र आल्यास हा आकडा ३६ वर पोहोचतो, जो बहुमतासाठी पुरेसा आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या भाजपला सत्तेपासून रोखणे आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी सोपे झाले आहे.
अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचे वाटप ठरले?
हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत केवळ युतीवरच नाही, तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा कालावधी कोणाला किती मिळणार, यावरही प्राथमिक शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. कोणत्याही परिस्थितीत ही युती तुटू द्यायची नाही, असा शब्द नेत्यांनी एकमेकांना दिला आहे. या निर्णयामुळे पाटण आणि फलटण सारख्या तालुक्यांत जिथे या दोन्ही पक्षांनी छुपी युती केली होती, तिथे आता अधिकृतपणे सत्तेची समीकरणे जुळली आहेत.
भाजपच्या गोटात शांतता की वादळापूर्वीची शांतता?
एकीकडे विरोधात हालचाली गतिमान झाल्या असताना, भाजपचे दिग्गज नेते आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार जयकुमार गोरे हे सध्या जिल्ह्याबाहेर आहेत. हे दोन्ही नेते साताऱ्यात परतल्यानंतर भाजप आपली सत्ता टिकवण्यासाठी काय खेळी खेळणार, की राष्ट्रवादी-शिवसेनेची ही नवी 'मैत्री' भाजपला विरोधी बाकावर बसवणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.