फलटण:"नाद करायचा नाही" अशी भाषेचा वापर करून दहशत कोण पसरवतंय हे जयकुमार गोरेंनी स्वतःच मान्य केलं आहे. मात्र, ही दादागिरी आणि दहशतीची भाषा सातारा जिल्हा कधीही खपवून घेणार नाही. इथून पुढे जर कोणी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला 'जशास तसे' उत्तर दिले जाईल, अशा कडक शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्री जयकुमार गोरे यांचा समाचार घेतला.
फलटण येथील भाजपच्या विजयी सभेत जयकुमार गोरे यांनी नाव न घेता शंभूराज देसाईंवर टीका केली होती. "कोणीतरी फलटणमध्ये येतं आणि शिवसेनेची दहशत चालणार नाही असं सांगतं, पण मलाही दाढी आहे आणि माझ्या नादाला लागायचं नाही, ज्यांनी माझा नाद केला त्यांना मी सोडलं नाही," असे प्रक्षोभक वक्तव्य गोरे यांनी केले होते. या विधानाचा शंभूराज देसाई यांनी आता जाहीर पंचनामा केला आहे.
गोरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, "नाद नाही करायचा असं जेव्हा गोरे म्हणतात, तेव्हा त्यांनी अप्रत्यक्षपणे हे मान्यच केलं आहे की दहशत त्यांचीच आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे की इथले वातावरण भयमुक्त असावे. निवडणुका असोत वा नसोत, प्रत्येकाला मोकळ्या वातावरणात काम करण्याचा अधिकार आहे."
"दहशत हा जिल्हा कधीच खपवून घेणार नाही. इथून पुढे जर कोणी दादागिरी किंवा दहशतीची भाषा केली, तर गाठ माझ्याशी आहे. प्रत्येक आव्हानाला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल."
— शंभूराज देसाई, पालकमंत्री, सातारा.
शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले की, साताऱ्याची जनता सुज्ञ आहे. विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी 'नाद' आणि 'बदल्याची' भाषा करणे लोकशाहीला घातक आहे. गोरेंनी स्वतःच्या विधानातून आपली वृत्ती जनतेसमोर उघडी पाडली असून, प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर अशा प्रकारची गुंडगिरी मोडून काढण्याचा निर्धार देसाई यांनी व्यक्त केला आहे.
या वादामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, "आता पालकमंत्र्यांनीच कंबर कसल्यामुळे दादागिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत," अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.