सातारा: सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये रविवारी झालेल्या बैठकीत फलटणच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पक्षाच्या सद्यस्थितीवर बोट ठेवले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकांकडे केलेल्या दुर्लक्षाबाबत फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र बेडके यांनी परखड मते मांडली, ज्यावरून जिल्हाध्यक्षांच्या दालनातच कराडच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा मोठा वाद झाला.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष रणजित सिंह देशमुख यांच्या दालनात चर्चा सुरू होती. यावेळी फलटणचे तालुकाध्यक्ष महेंद्र बेडके यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली. "निवडणुकीच्या काळात वरिष्ठ नेत्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये लक्ष दिले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे त्यांच्याकडून आता कोणतीही मोठी अपेक्षा धरू नका," अशा स्पष्ट शब्दांत बेडके यांनी जिल्हाध्यक्षांकडे आपली तक्रार मांडली.
बेडके यांनी मांडलेली ही परखड भूमिका कराडच्या पदाधिकाऱ्यांना पचनी पडली नाही. कराडचे पदाधिकारी प्रशांत पवार यांनी पृथ्वीराज चव्हाणांची बाजू सावरून धरण्याचा प्रयत्न केला. "बाबांमुळेच जिल्ह्यात काँग्रेस जिवंत आहे," असा दावा करत त्यांनी बेडके यांच्याशी हुज्जत घातली. यावरून दोन्ही बाजूचे पदाधिकारी आमनेसामने आले आणि जिल्हाध्यक्षांच्या दालनातच तासभर जोरदार शाब्दिक राडा झाला.
फलटणच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, पक्ष वाढवण्यासाठी जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करून केवळ मोठ्या नावांच्या जोरावर निवडणुका जिंकता येणार नाहीत. बेडके यांनी उपस्थित केलेले मुद्दे हे केवळ फलटणपुरते मर्यादित नसून, जिल्ह्यातील अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनातील भावना असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांनी मध्यस्थी करत हा वाद तात्पुरता मिटवला असला, तरी फलटण विरुद्ध कराड असा हा संघर्ष आता उघड झाला आहे. स्वतःच्याच नेत्याला आरसा दाखवल्यामुळे फलटणच्या या 'सणसणीत' भूमिकेची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.