फलटण (प्रतिनिधी):राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कोळकी जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे (राजे गट) उमेदवार सह्याद्री चिमणराव कदम यांनी भाजपचे उमेदवार जयकुमार शिंदे यांचा प्रचंड मताधिक्क्याने पराभव करत विजय संपादन केला आहे. या विजयामुळे कोळकी हा 'राजे गटाचा' बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक आणि त्यांचे 'नाक' समजले जाणारे जयकुमार शिंदे यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा मानहानीकारक ठरला आहे. स्वतःच्या बालेकिल्ल्यात आणि जवळच्या कार्यकर्त्याला निवडून आणण्यात रणजितसिंह अपयशी ठरल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्यावर सडकून टीका होत आहे. दुसरीकडे, स्वर्गीय चिमणराव कदम यांना मानणारा मोठा वर्ग आणि राजे गटाचे निष्ठावान मतदार यांनी एकजूट दाखवत शिवसेनेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
केवळ जिल्हा परिषदच नव्हे, तर कोळकी गटांतर्गत येणाऱ्या एक पंचायत समितीच्या जागांवर शिवसेनेने कब्जा मिळवला आहे.
थोडक्यात पण महत्त्वाचे:
- कोळकी बालेकिल्ला: राजे गटाचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध.
- रणजितसिंहांची पिछेहाट: भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवूनही दारूण पराभव.
- शिवसेनेची सरशी: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, सर्वत्र भगवा.
या विजयामुळे कोळकी परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला, तर भाजपच्या गोटात मात्र शांतता पसरली आहे.