फलटण पालिकेत 'खासदार गटा'चा वरचष्मा; प्रियादर्शनी भोसले उपनगराध्यक्षपदी, तर अनिकेतराजे निंबाळकरांची 'स्वीकृत' म्हणून एन्ट्री!
फलटण (प्रतिनिधी):फलटण नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित सभागृहाची पहिलीच विशेष सभा आज राजकीय ठिणग्यांनी आणि अनपेक्षित घडामोडींनी गाजली. अपेक्षेप्रमाणे उपनगराध्यक्षपदी सत्ताधारी खासदार गटाच्या सौ. प्रियादर्शनी रणजीतसिंह भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र, या निवडी प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला सारत भाजपने आपली पकड मजबूत केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आज झालेल्या विशेष सभेत उपनगराध्यक्षपदासाठी सौ. प्रियादर्शनी भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. नियमानुसार, उपनगराध्यक्ष हे शिक्षण व क्रीडा समिती'चे पदसिद्ध सभापती असतात. त्यामुळे आता शहराच्या शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्राची धुरा एका महिला नेतृत्वाकडे सोपवण्यात आली आहे.
या निवडीच्या निमित्ताने फलटणच्या राजकारणात एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) उपनगराध्यक्षपद मिळेल, अशी कार्यकर्त्यांची ठाम खात्री होती. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीला 'कोलदांडा' दाखवत भाजपने आपल्याच नगरसेविकेला या पदावर बसवले. इतकेच नव्हे तर, दोन स्वीकृत नगरसेवकही भाजपचेच निवडून आल्याने पालिकेत आता केवळ भाजपचाच वरचष्मा पाहायला मिळत आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून, "सत्तेत वाटा असूनही राष्ट्रवादीला डावलले का?" असा प्रश्न विचारला जात आहे.
दुसरीकडे, प्रतिष्ठेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी विरोधी 'राजे गटाने' मोठी राजकीय खेळी खेळली. अनपेक्षितपणे युवराज अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची स्वीकृत नगरसेवक पदी वर्णी लागल्याने त्यांचा सभागृहात प्रवेश निश्चित झाला आहे. अनिकेतराजेंच्या एन्ट्रीमुळे आता सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळणार, हे स्पष्ट झाले आहे.
नगराध्यक्षपदी समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि आता उपनगराध्यक्षपदी प्रियादर्शनी भोसले यांच्या निवडीमुळे पालिकेवर खासदार गटाची पकड पूर्णपणे घट्ट झाली आहे. मात्र, अनुभवी चेहरे आणि अनिकेतराजेंसारखे तरुण नेतृत्व समोर असल्याने आगामी काळात फलटण पालिकेचा कारभार चांगलाच गाजणार आहे.